Wednesday, December 21, 2011

कापसाचे भाव न वाढल्याने शेतकरी हताश-लोकमत

कापसाचे भाव न वाढल्याने शेतकरी हताश-लोकमत
http://onlinenews1.lokmat.com/php/detailednews.php?id=NagpurEdition-2-8-20-12-2011-00a93&ndate=2011-12-21&editionname=nagpur
आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव घसरत असताना शेतकर्‍यांसह राजकीय पक्ष, सामाजिक संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करीत होत्या. त्यामुळे शासन कापूस भाववाढ करेल, ही आशा होती. परंतु राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनात कापसाची भाव वाढ न करता, दोन हजार कोटींचे पॅकेज जाहीर केल्याने बळीराजा हताश झाला आहे.
आता कापूस भाववाढीचे सर्वच मार्ग खुंटल्याने निराश झालेले शेतकरी कापूस विक्रीसाठी लगबगीने बाजाराकडे वळले आहेत. कापसाची आवक वाढताच व्यापार्‍यांनी कापसाचे भाव कमी केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव यावर्षी कमी आहेत. देशातही कापसाचे भाव वाढण्याची शक्यता नाही. मात्र आंदोलन, मोर्चे, धरणे देऊन शासनाचे लक्ष या प्रश्नाकडे वळविल्यास राज्य शासन कापसाचे भाव काही प्रमाणात वाढवून देईल, अशी शेतकर्‍यांना आशा होती. शासनाला वेठीस धरल्यास कापसाचे दर वाढतील, हे उसाच्या आंदोलनावरून शेतकर्‍यांना कळून चुकले होते. त्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला बर्‍यापैकी भाव मिळत असतानाही शेतकर्‍यांनी कापूस घरात साठवून आंदोलन केले.
या आंदोलनात विरोधकांसह सत्ताधारीही सहभागी झाले होते. सोबतच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी कापसाचे दर वाढवतील, ही आशा शेतकर्‍यांना होती. परंतु राज्य शासनाने कापूस उत्पादक शेतकर्‍यांसमोर न झुकता पॅकेज जाहीर करून शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली. त्यामुळे शेतकरी प्रचंड निराश झाले आहे. त्यांच्या मनात राजकीय पक्षांविषयी प्रचंड असंतोष खदखदत आहे.
हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी लोकप्रतिनिधींसोबतच विरोधी लोकप्रतिनिधी कापसाच्या प्रश्नावरून रान उठवतील, हा शेतकर्‍यांचा अंदाज फोल ठरला. राजकीय पक्षांनी नौटंकी करीत आठवडा काढला. परंतु शेतकरी मात्र निराशेच्या गर्तेतच ढकलला गेला. कापसाचे भाव वाढण्याची आशा धूसर झाल्यामुळे उद्विग्न शेतकरी आता कापूस विक्रीकडे वळला आहे. कापूस विक्रीसाठी शेतकर्‍याची गर्दी वाढली आहे.
कापसाची आवक वाढताच कापसाचे दर खाली आले आहेत. सध्या तीन हजार ७00 रुपयापर्यंत कापसाचे भाव खाली आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव घसरल्याने कापसाचे भाव पुन्हा खाली येण्याच्या भीतीने शेतकर्‍यांनी कापूस विकण्याची घाई चालविली आहे. त्याचा लाभ घेत आहेत. कापूस विक्रीसाठी गर्दी वाढताच विविध कारणे सांगून व्यापारी कापूस कमी दरात खरेदी करीत आहेत. त्यामुळे बळीराजा आर्थिक कोंडीत सापडला आहे.

No comments: