Tuesday, December 6, 2011

कर्जाला कंटाळून दोन शेतकऱ्यांची आत्महत्या-सकाळ वृत्तसेवा

कर्जाला कंटाळून दोन शेतकऱ्यांची आत्महत्या
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, December 06, 2011 AT 10:44 PM (IST)
नागपूर - नापिकी, कर्जबाजारीपणा तसेच शेतमालाला मिळत असलेला कवडीमोल भाव यातून विदर्भातील शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. याच विमनस्क अवस्थेतून यवतमाळ आणि वाशीम जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. 5) आत्महत्या केल्याचे मंगळवारी उघड झाले आहे.
सावळी सदोबा (जि. यवतमाळ) येथून जवळ असलेल्या केळझरा येथील अल्पभूधारक शेतकरी भीमराव शिवराम मेश्राम (वय 56) यांनी सोमवारी (ता. पाच) घरात जाळून घेऊन आत्महत्या केली. त्यावेळी त्यांची पत्नी शेतात कापूस वेचण्यासाठी गेली होती.

भीमराव यांनी जाळून घेताच गावकऱ्यांनी त्यांना वाचविण्यासाठी धाव घेतली. त्यांना उपचारासाठी यवतमाळ रुग्णालयात दाखल केले. उपचारादम्यान त्यांचा मृत्यू झाला. भीमराव यांच्यावर 25 हजार रुपयांचे सोसायटीचे जुने कर्ज आहे. त्यांना यंदा सोसायटीने कर्ज दिले नसल्याचे समजते. यावर्षी कसेबसे करून शेती केली. चांगले पीक होईल, शिवाय गेल्यावर्षी कापसाचे चांगले भाव पाहून त्यांनी यावर्षी जास्त कापूस पेरला होता. पण, पावसाने दगा दिला आणि उत्पन्नच घटले. गेल्यावर्षी मुलीचे लग्न केल्यामुळे सोसायटीचे कर्ज फेडणे झाले नाही, असे त्यांच्या पत्नीने सांगितले.

मालेगाव (जि. वाशीम) तालुक्‍यातील उमरदरी या डोंगराळ भागातील गावातील शेतकरी बाळाभाऊ देवीचंद राठोड (वय 39) यांनी सोमवारी (ता. पाच) सायंकाळच्या सुमारास विषप्राशन केले. त्यांना तातडीने वाशीम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखले केले असता उशिरा रात्री त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या नावावर 1.34 हेक्‍टर जमीन आहे. तसेच विविध बॅंकेचे कर्जसुद्धा आहे. कर्जबाजारीपणाला वैतागून त्यांनी विषप्राशन करून आत्महत्या केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी आहे.

No comments: