Friday, April 29, 2011

कापूस निर्यात आणि तूर खरेदीच्या मागणीसाठी उद्या --LOKSATTA






कापूस निर्यात आणि तूर खरेदीच्या मागणीसाठी उद्या धरणे- -


नागपूर, २९ एप्रिल/प्रतिनिधी
कापसाची निर्यात खुली करा आणि तुरीची खरेदी ३५०० रूपये प्रति क्विंटल हमी भावाने करा या मागणीसाठी येत्या १ मे रोजी धरणे देण्यात येणार असल्याची माहिती विदर्भ जनआंदोलन समितीने दिली आहे.
सरकारने कापसाच्या गाठीच्या निर्यातीचा कोटा ५५ लाखावरून १ लाख ५० हजारावर नेण्याचे आश्वासन थंडय़ाबस्त्यात टाकल्यामुळे कापसाच्या भावात प्रचंड घसरण आली. त्यामुळे मागील १५ दिवसात कापसाचे भाव ६ हजार ५०० रूपयांवरून सरसकट ३ हजार ८०० वर आले आहे. ही घसरण पुढेही अशीच सुरू राहणार असून कापसाच्या हमी भावापेक्षा कमी भावातसुद्धा व्यापारी कापूस खरेदी करतील, अशी भीती समितीने व्यक्त केली आहे. गेल्यावर्षी कापसाचे उत्पादन २४० लाख गाठी झाल्या असताना सरकारने ८५ लाख गाठीच्या निर्यातीची परवानगी दिली होती. मात्र, यावर्षी सरकार कापसाचे उत्पादन ३५० लाख गाठी होणार असा दावा करत असताना कापसाच्या गिरणी मालकांचे हित जोपासण्यासाठी व त्यांना स्वस्त दरात कापूस मिळावा याकरीता सरकारने निर्यात बंदी लागू केली, असा आरोप समितीने केला आहे. सरकारचे वाणिज्य मंत्री आनंद शर्मा यांनी मंगळवारी सरकार कापसाच्या निर्यातीसंबंधी सर्व निर्णय ऑक्टोबरमध्ये घेणार व गिरणी मालकांच्या हितासाठी आम्ही बांधील आहोत अशी घोषणा केल्यामुळे कापसाच्या किंमतीत ही घसरण सुरू असून सरकारने कापसाची निर्यात तात्काळ सुरू करावी व निर्यातीचा कोटा १५० लाख गाठीचा करावा, या मागणीसाठी १ मे रोजी शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती विदर्भ जनआंदोलन समितीने दिली.
यावर्षी भारतात तुरीचा पेरा वाढावा यासाठी सरकारने तुरीचा हमी भाव ३ हजार रूपये प्रति क्विंटल केला व तुरी पेरणाऱ्या शेतकऱ्याला प्रति क्विंटल ५०० रूपये बोनस देण्याची अधिकृत घोषणा केली. महाराष्ट्राच्या कृषी विभागाने या योजनेचा प्रचार, प्रसार केला व विदर्भात १ लाख २० हजार हेक्टरमध्ये तुरीचा विक्रमी पेरा झाला. मात्र, आज शेतकऱ्यांच्या तुरीला जेमतेम २२०० रूपये प्रति क्विंटल भाव मिळत असून व्यापारी तुरी घेण्यास तयार नाहीत. मात्र, ३ हजार ५०० रूपये प्रति क्विंटली घोषणा करणारे सरकार मागील ३ महिन्यापासून संकलन केंद्र सुरू करून खरेदी करण्यास अपयशी ठरले आहे. सरकारने नाफेड व पणन महासंघामार्फत तुरीची खरेदी ३ हजार ५०० रूपये दराने करावी व या खरेदीमध्ये शेतकऱ्यांना लुटणाऱ्या व्यापाऱ्यांना तुर विकता येऊ नये, यासाठी व्यवस्था करावी या मागणीचाही रेटा १ मे रोजी आयोजित धरणे आंदोलनात करणार असल्याची माहिती विदर्भ जनआंदोलन समितीने दिली आहे. या आंदोलनात विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी, माजी जिल्हा परिषद सदस्य तुकाराम मेश्राम, समितीचे सचिव मोहन जाधव, सुरेश बोलेणवार आदी सहभागी होतील.

No comments: