Monday, April 11, 2011

तुरीला हमी भाव व बोनस देण्याची सरकारची घोषणा फोल--विदर्भ जनआंदोलन समिति -लोकसत्ता

तुरीला हमी भाव व बोनस देण्याची सरकारची घोषणा फोल--विदर्भ जनआंदोलन समिति -लोकसत्ता
नागपूर, ११ एप्रिल/प्रतिनिधी

महाराष्ट्रात तुरीचा हमीभाव ३ हजार रुपये प्रति क्विंटल आणि प्रत्येक क्विंटलमागे ५०० रूपये विशेष बोनस देणार, अशी केंद्रीय कृषी खात्याने व महाराष्ट्राच्या कृषी विभागाने केलेली घोषणा खोटी ठरली आहे, असा आरोप विदर्भ जनआंदोलन समितीने केला. केंद्र आणि राज्याच्या कृषी खात्याने वरील घोषणा केली होती. विदर्भात यावर्षी तुरीचे १ लाख ३४ हजार हेक्टरमध्ये उत्पन्न घेण्यात आले. ३ हजार रूपये प्रति क्विंटल व त्यावरील ५०० रूपये प्रति क्विंटल बोनस याप्रमाणे ३ हजार ५०० रूपये प्रति क्विंटल दराने पणन महासंघामार्फत व नाफेडद्वारे तूर सरकार खरेदी करेल, अशी घोषणा कृषीमंत्री शरद पवार यांनी केली होती. मात्र, आजपर्यंत एकही किलो तूर सरकारने खरेदी केली नाही. व्यापाऱ्यांनी तुरीचा भाव सरसकट २ हजार ८०० रूपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आणला आहे. विदर्भातील वर्धा, अकोला, यवतमाळ, वाशिम व अमरावती येथील प्रमुख तूर उत्पादक क्षेत्रात तर व्यापाऱ्यांनी अधिकृत तूर खरेदी कॉटन मार्केटच्या यार्डात बंद केली असून, अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना २२०० रूपये प्रति क्विंटलप्रमाणे तूर विकावी लागली. सरकारने तूर दाळ उत्पादन वाढवण्यासाठी राबवलेल्या महत्त्वाकांक्षी योजनेचा केंद्रीय कृषी खाते व राज्याच्या पणन महासंघाने बोजवारा वाजवला आहे. हमी भाव व बोनस न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे कमीतकमी १५०० कोटी रूपये बुडाले असल्याचा, आरोपही समितीने केला आहे. ज्या शेतकऱ्यांनी त्यांची तूर हमी भावापेक्षा कमी भावात विकली त्या सर्व शेतकऱ्यांना प्रति क्विंटल कमीतकमी १ हजार रूपये नगदी अनुदान घोषित करण्यात यावे, अशी मागणी विदर्भ जनआंदोलन समितीचे किशोर तिवारी यांनी केली आहे. एकीकडे सरकार यावर्षी कृषी उत्पादनाचे विक्रमी दावे करीत आहे, त्याचवेळी कापूस, धान व तूर उत्पादक शेतकरी अति पावसामुळे व बाजारातील व्यापाऱ्यांनी केलेल्या एकजुटीमुळे आर्थिक अडचणीत आले आहे. सरकारचे दावे प्रत्यक्षात झालेल्या उत्पादनाच्या ४० टक्के जास्त असून अधिकाऱ्यांनी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांना खोटी माहिती दिल्याचा आरोप किशोर तिवारी यांनी केला. देशात तुरीच्या दाळीचे भाव १०० रूपयाच्या वर गेल्यावर व ७० टक्के तूर विदेशातून आयात करावी लागते. यासाठी भारताच्या शेतकऱ्यांनी दाळ उत्पादन करावे म्हणून केंद्र सरकारने भरपूर गाजावाजा करून तूर दाळीचा हमी भाव ३ हजार रूपये केला आणि प्रत्येक क्विंटलमागे ५०० रूपये बोनस जाहीर केला. मात्र, संपूर्ण हंगाम संपला असताना सरकारने हमी भाव व बोनससाठी कोणतीही व्यवस्था न केल्यामुळे शेतकऱ्यांची ही शुद्ध फसवणूक आहे. सरकारने तूर उत्पादन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली नाही तर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा समितीचे सचिव मोहन जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य तुकाराम मेश्राम आदींनी केली आहे.


तुमची संपर्क माहिती:
प्रतिक्रिया:

No comments: