Thursday, December 30, 2010

पारोमिता गोस्वामी

वर्षवेध २०१० : पारोमिता गोस्वामी

Paromita Goswami Founder President Shramik Elgar


लोकसत्ता-नागपूर
एखादे काम हाती घेतले की त्याची तड लागेपर्यंत स्वस्थ बसायचे नाही हा कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये आवश्यक असलेला गुण पारोमितामध्ये ठासून भरला आहे. वेठबिगाराचे प्रकरण असो, आदिवासींच्या जमीनी परत मिळवून देण्याचा प्रश्न असो वा चिन्ना मट्टामीचा लढा असो, पारोमिता व तिची संघटना न्याय मिळवूनच शांत झाली.
* स्वातंत्र्यपूर्व काळात सेवाकार्याचे केंद्र अशी ओळख असलेल्या मूल शहराला तब्बल पाच दशकानंतर तीच ओळख पुन्हा मिळवून देण्यात श्रमिक एल्गार व त्याच्या प्रमुख पारोमिता गोस्वामी यांचा सिंहाचा वाटा आहे. मूळची कोलकत्याची व मुंबईतून समाजकार्यात पदवी घेतलेली पारोमिता दहा वर्षांपूर्वी या जिल्हय़ात आली तेव्हा स्थानिक भाषेचा गंधही तिला नव्हता. स्वप्नाळू डोळय़ांची ही मुलगी कुणी सोबतीला नसतांना इथे काय करणार असा प्रश्न तेव्हा सर्वाच्या मनात उभा राहायचा. अवघ्या दहा वर्षांत पारोमिताने या प्रश्नाचे उत्तर सर्वाना देऊन टाकले आहे. तिने स्थापन केलेल्या संघटनेचे पंचेवीस हजार सभासद व पाचशे पूर्णवेळ कार्यकर्ते चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्हय़ात आहेत. आपल्या मोजक्या पण विश्वासू सहकाऱ्यांच्या साथीने पारोमिताने या जिल्हय़ातील महिला, आदिवासी, दलित, कामगार, शेतकरी, शेतमजूर या गरीब घटकांसाठी जो लढा दिला त्याचे सर्व स्तरावरून कौतूक झाले. एखादे काम हाती घेतले की त्याची तड लागेपर्यंत स्वस्थ बसायचे नाही हा कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये आवश्यक असलेला गुण पारोमितामध्ये ठासून भरला आहे. वेठबिगाराचे प्रकरण असो, आदिवासींच्या जमीनी परत मिळवून देण्याचा प्रश्न असो वा चिन्ना मट्टामीचा लढा असो, पारोमिता व तिची संघटना न्याय मिळवूनच शांत झाली. प्रश्न रेंगाळत ठेवण्याच्या राजकीय कलेला तिने आजूबाजूलाही फटकू दिले नाही. त्यामुळे अन्यायग्रस्त लोक तिच्याकडे मोठय़ा आशेने बघतात. उपेक्षितांचे प्रश्न सोडवतांना प्रशासनाशी तिचा होणारा संघर्ष आता तिच्या जीवनशैलीचा एक भाग झाला आहे. या संघर्षांत अनेकदा तिला कारागृहात जावे लागले. थंडी, ऊन, वारा, पाऊस झेलत रस्त्यावर रात्री काढाव्या लागल्या. पण यातून खचून जाण्याऐवजी तिच्या उमेदीत व जिद्दीत सतत वाढ होत गेली. लोकशाहीच्या मार्गाने लढे देऊनही प्रश्न सुटत नाही म्हटल्यावर न्यायालयाच्या माध्यमातून यश कसे मिळवायचे असते, हे पारोमिता व तिच्या संघटनेने या भागाला दाखवून दिले. लोकशाहीवर नितांत श्रद्धा असलेल्या व कायम लोकांसाठी संघर्ष करणाऱ्या पारोमिताच्या वाटय़ाला दु:खाचे क्षणही काही काळ आले. तिची बंगाली पाश्र्वभूमी लक्षात घेऊन काही स्थानिक राजकारण्यांनी प्रशासनाला हाताशी धरून तिला नक्षलवादी ठरवून टाकले आणि संघटना बंदीची कारवाई सुरू केली. तेव्हा सैरभर झालेली पारोमिता थेट न्यायालयात गेली व दीड वर्षांची लढाई जिंकूनच परत आली. त्या काळात तिची संघटना मोडते की काय अशीच शंका सर्वाना येत होती पण लढाई जिकंताच ही संघटना तेवढय़ाच ताकदीने उभी राहिली. केवळ संघटनेसाठी आणि त्यामाध्यमातून वंचिताचे प्रश्न सोडवता यावेत म्हणून हैद्राबादच्या राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्थेने देऊ केलेल्या प्राध्यापकाच्या नोकरीवर पाणी सोडणाऱ्या पारोमिताने आता दारूबंदीचा लढा हाती घेतला आहे. या प्रश्नावर निघालेल्या महिलांच्या पदयात्रेने थंडपणे चाललेल्या हिवाळी अधिवेशनाचा नूर पार पालटून गेला. पुरुषाच्या व्यसनाचे चटके सहन करणाऱ्या या कष्टकरी महिला पायांना चटके देत जेव्हा अधिवेशनावर चालून गेल्या तेव्हा सरकारही क्षणभर हबकलेच. या यात्रेत इतक्या मोठय़ा संख्येत महिला कशा या प्रश्नाचे उत्तर पुन्हा पारोमिता व तिच्या संघटनेच्या कार्यशैलीत दडले आहे. कोणताही प्रश्न हाती घेतला की त्याच्या मूळापर्यंत जायचे हा पारोमिताचा स्वभाव आहे. या यात्रेच्या आधीचे सहा महिने पारोमिता पायाला भिंगरी लागल्यागत गावोगाव फिरली. प्रत्येक गावात ठराव, त्याला कुठे विरोध तर कुठे सहमती असे प्रकार होत एक वातावरण निर्मिती झाली. त्यामुळेच या यात्रेचे स्वरूप मोठे झाले. केवळ लढे देणे हे एकमेव काम पारोमिता व तिच्या संघटनेचे नाही. श्रमिक एल्गारने मूलमध्ये मोठे संकूल उभारून अनेक रचनात्मक कामे सुरू केली आहेत. एक कोटीची उलाढाल असलेली महिलांची पतसंस्था, लाखोची उलाढाल करून शेतकऱ्यांना माफक दरात खत व बियाणे मिळवून देणाऱ्या सहकारी संस्था, ग्रामीण मुलांसाठी बालविज्ञान व पर्यावरण केंद्राची स्थापना, असे अनेक उपक्रम ही संघटना राबवत आहे. कायदे सोप्या भाषेत सांगणारी पाच पुस्तके लिहणाऱ्या पारोमिताला अमेरिकेतील येल विद्यापीठाने अभ्यासवृत्ती देऊन गौरवले आहे. पती कल्याणकुमार व आरंभापासूनचा सहकारी विजय सिद्धावार आणि शेकडो कार्यकर्त्यांच्या मदतीने सेवाकार्याचा व्याप विस्तारणाऱ्या पारोमितासमोर आता खरे आव्हान जिल्हा दारूबंदीचे आहे.

No comments: