Sunday, July 22, 2012

महिको बीटी बियाण्यांवर बंदीच्या घोषनेचे स्वागत- महिकोचे राजू बारवाले यांच्यावर कारवाई करा-किशोर तिवारी यांची मागणी-तभा वृत्तसेवा

महिको बीटी बियाण्यांवर बंदीच्या घोषनेचे स्वागत- महिकोचे राजू बारवाले यांच्यावर कारवाई करा-किशोर तिवारी यांची मागणी-तभा वृत्तसेवा
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, २२ जुलै
राज्य शासनाने महिको मॉन्सेण्टो कंपनीच्या बीटी कापूस बियाण्यांवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. ही कारवाई बिनबुडाची असून, महिको कंपनी आता महाराष्ट्र सरकारवरच कायदेशीर कारवाई करेल, अशी धमकी महिको मॉन्सेण्टोचे कार्यकारी संचालक डॉ. राजू बारवाले यांनी दिली आहे. बारवालेंची ही धमकी म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोम्ब्याच  असाच प्रकार असून, त्यांच्यावर महाराष्ट्र सरकारनेच फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केली आहे.
राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी गेल्या आठवड्यात विधानसभेत महिको मॉन्सेण्टो कंपनीच्या बीटी बियाणे विकण्याचा महाराष्ट्रातील परवाना रद्द करण्याची आणि त्यासाठी लागणारी कायदेशीर कारवाई पूर्ण करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर सरकारने महाराष्ट्राच्या डायरेक्टर ऑफ इनपूट अ‍ॅण्ड क्वालिटी कंट्रोल यांच्याकडे महाराष्ट्र कापूस कायदा २००९ अंतर्गत महिको मॉन्सेण्टोचा बीटी बियाणे परवाना रद्द करण्यासाठी पुराव्यांनिशी तक्रार केली असल्याची माहिती विदर्भ जनआंदोलन समितीने दिली आहे.
राज्य शासनाने महिको मॉन्सेण्टो कंपनीच्या बीटी कापूस बियाण्यांवर बंदी घालण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव शेवटच्या टप्प्यात असताना महिको मॉन्सेण्टोचे कार्यकारी संचालक डॉ. राजू बारवाले यांनी महाराष्ट्राच्या कृषिमंत्र्यांनी केलेले आरोप आणि सरकारने केलेली कारवाई बिनबुडाची असून, कंपनी सरकारवरच कायदेशीर कारवाई करणार असल्याची धमकी दिली आहे. डॉ. बारवाले यांचा हा पवित्रा धक्कादायकच असल्याचे समितीने म्हटले आहे. मुळात महाराष्ट्रात बीटी महिको मॉन्सेण्टोच्या बीटी बियाण्यांवर बंदी बियाण्यांचा काळाबाजार राजरोसपणे होत असून, महिको मॉन्सेण्टोच आपला कापूस एकाधिकार निर्माण करून, शेतकरयांना वेठीला धरून लुटत असल्याचाही आरोप समितीने केला आहे.
यापूर्वी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी विधानसभेत महिको मॉन्सेण्टो कंपनी विदर्भ व मराठवाड्यात आपल्या वितरकांशी संगनमत करून बियाण्यांचा खुलेआम काळाबाजार करीत असल्याची माहिती दिली होती. कंपनीविरुद्ध १७ पोलिस तक्रारी असून, अनेक अधिकारयांनी अटकपूर्व जामीन घेतला आहे. अनेक न्यायालयांनी तर अटकपूर्व जामीनसुद्धा नाकारला आहे. गेल्या वर्षीसुद्धा महाराष्ट्र सरकारने महिको मॉन्सेण्टोविरुद्ध फौजदारी कारवाई केली होती, याकडे किशोर तिवारी यांनी लक्ष वेधले आहे. राजकीय संरक्षणामुळे महिको मॉन्सेण्टो कंपनी आपला बीटी कापूस बियाण्यांचा काळाबाजार राजरोसपणे करीत आहे आणि त्याचवेळी कंपनीचे मालक डॉ. राजू बारवाले सरकारला दोषी धरून सरकारवरच कायदेशीर कारवाई करण्याची धमकी देत आहेत. जालना येथील महिको कंपनीने अमेरिकेच्या मॉन्सेण्टो कंपनीचे समभाग विकत घेऊन बीटीसारखे जैविक बियाणे निर्माण करण्यासाठी २००२ मध्ये भारत सरकारकडून परवानगी घेतली होती, अशीही माहिती त्यांनी दिली आहे.
२००१  पासून  भारतात १ लखावर कापूस  उत्पादक शेतकरयांनी सतत नापिकी व कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्या असून, त्यासाठी महिको मॉन्सेण्टो कंपनीच जबाबदार आहे, असा स्पष्ट आरोप किशोर तिवारी यांनी केला आहे. यासाठी कंपनीचे कार्यकारी संचालक डॉ. राजू बारवालेवर सदोष मनुष्यवधाची कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

No comments: