Tuesday, July 3, 2012

गृहमंत्रालयाच्या आकडेवारीनुसार २०११ मध्ये शेतकरी आत्महत्येत महाराष्ट्र अव्वल -शरद पवारांनी या शेतकरयांच्या आत्महत्येची जबाबदारी घेत राजीनामा द्यावा

      
गृहमंत्रालयाच्या आकडेवारीनुसार २०११ मध्ये शेतकरी आत्महत्येत महाराष्ट्र अव्वल -विदर्भात चारदिवसांत दुबार पेरणीचे संकट-पिककर्ज नाकारलेल्या शेतकरयांच्या आत्महत्या-तरुण भारत
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, ३ जुलै
विदर्भात जून महिन्याच्या दुसरया आठवड्यात आलेल्या दडप्या पावसाने पेरणी केलेल्या व नंतर सतत २० दिवस उघाड व कडक उन्हामुळे सर्व पेरणी मोडल्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. सरकारी व सहकारी बँकांनी पीककर्ज नाकारल्यामुळे सावकाराच्या दारावर चकरा मारणारया आणखी
शेतकरयांच्या आत्महत्या मागील चार दिवसांत समोर आल्याची माहिती विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिली आहे. या दुर्दैवी शेतकरयांमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील तीन शेतकरी आहेत. विजय पिपळशेंडे, रा. सोनुर्ली, अंबादास हांतगावकर, रा. कोंघारा, बाबुलाल राठोड, रा. देऊरवाडी, अशी त्यांची नावे आहेत तर वर्धा येथील हिवारयाचे विथल जुगनाके व वाधोन्याचे सुरेश ठोकले  यांच्या समावेश  आहे  . रामदास हिगवे, रा. नारा, जि. वर्धा, राजेंद्र वाढई, रा. सुपलीपार, जि. गोंदिया, ज्ञानेश्वर तायडे, रा. तेल्हारा, जि. अकोला, राजू भांडेकर, रा. शिवणी, जि. वाशीम या विदर्भातील शेतकरयांनी मृत्यूला कवटाळले आहे. २०१२ मध्ये आत्महत्या करणारया शेतकरयांचा आकडा आता ४२५ वर पोहचला  असल्याचे किशोर तिवारी यांनी म्हटले आहे.
संपूर्ण विदर्भात पाण्याचे प्रचंड संकट समोर येत आहे. निसर्गाचा लहरीपणा या संकटाला कारणीभूत आहे. पावसाचा फटका बसण्याचे हे तिसरे वर्ष आहे. बी. टी. कापसाचा पेरा करणे शेतकरयांना घातक सिद्ध होणार आहे. विदर्भाच्या कोरडवाहू शेतकरयांना कापूस व ऊस या सारख्या अती पावसाच्या पिकांपासून वंचित ठेवण्यासाठी सरकारने तूर, ज्वारी व मूग यासारख्या भरड धान्यांच्या शेतीसाठी प्रती एकरी १० हजार संपूर्ण रुपये अनुदान द्यावे, हे भरड धान्य घेण्यासाठी बियाण्यांचा मोफत पुरवठा करावा, हे धान्य सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये वाटण्यासाठी सरकारने विशेष बोनस देऊन विकत घ्यावे, अशी कळकळची मागणी विदर्भ जनआंदोलन समितीने केली आहे.
गृह मंत्रालयाच्या राष्ट्रीय गुन्हे नोंदची (नॅशलन क्राईम रेकॉर्ड ब्युरोने) २०११ शेतकरी आत्महत्येची अधिकृत आकडेवारी जाहीर केली असून, संपूर्ण भारतात २०११ मध्ये १४००४ शेतकरयांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामध्ये पुरोगामी महाराष्ट्रात सर्वाधिक ३३३७ शेतकरयांनी आत्महत्या केल्याची अधिकृत कबुली भारत सरकारने दिली असल्याचे तिवारी यांनी म्हटले आहे. मागील वर्षी हा आकडा ३१४१ होता. महाराष्ट्रात ज्या ३३३७ शेतकरयांनी आत्महत्या केल्या आहे त्यामध्ये विदर्भ व मराठवाडा येथील कोरडवाहू शेतकरयांची संख्या ७० टक्के असून, या दुष्काळग्रस्त भागात मागील ५ वर्षांपासून सरकारने पॅकेजच्या नावावर १० हजार कोटी रुपयांच्यावर खर्च केले असून, ही सारी रक्कम राजकीय नेते व कंत्राटदारांनी चोरल्यामुळे शेतकरयांच्या आत्महत्या सुरूच असल्याचा आरोप किशोर तिवारी यांनी केला आहे. मागील लोकसभेच्या अधिवेशनात भारताचे कृषिमंत्री शरद पवार यांनी महाराष्ट्रात २०११ मध्ये फक्त ३३७ आत्महत्या झाल्याची\ कबुली दिली होती. मात्र, आता भारत सरकारच्या गृहमंत्रालयाने महाराष्ट्राच्या शेतकरयांच्या आत्महत्येचा आकडा ३३३७ असल्याची धक्कादायक माहिती दिल्यावर भारताच्या कृषिमंत्र्यांनी जाणून बुजून आत्महत्येच्या आकड्यातील ३३३७ मधील ३ चा आकडा कमी करून लोकसभा व देशाची दिशाभूल केल्याचा आरोप किशोर तिवारी यांनी केला आहे. शरद पवारांनी या शेतकरयांच्या आत्महत्येची जबाबदारी घेत आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीसुद्धा किशोर तिवारी यांनी केली आहे.

No comments: