Tuesday, August 30, 2011

गरिबीला कंटाळून दाम्पत्याची आत्महत्या -लालफीतशाहीने घेतला ‘त्या’ दाम्पत्याचा बळी - शासनाच्या विविध योजनांपासून वंचित-लोकमत

गरिबीला कंटाळून दाम्पत्याची आत्महत्या -लालफीतशाहीने घेतला ‘त्या’ दाम्पत्याचा बळी - शासनाच्या विविध योजनांपासून वंचित-लोकमत
Nagpur-30-08-2011
स्थानिक प्रोफेसर कॉलनीत झोपडीत राहणार्‍या एका दाम्पत्याने गरिबीला कंटाळून आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी ६.३0 च्या सुमारास उघडकीस आली. ऐन तान्हा पोळ्याच्या दिवशी दाम्पत्याने केलेल्या आत्महत्येमुळे कॉलनीमध्ये शोककळा पसरली आहे.

मृत दाम्पत्याचे नाव राजेश नारायण डेरे (३२) व पत्नी पूनम (२६) असे आहे. हे दोघेही मोलमजुरी करून उदनिर्वाह करीत होते. घरात आठराविश्‍वे दारिदय़्र त्यात राजेशचे दारूचे व्यसन यामुळे नेहमीच पैशाची चणचण राहात होती. यावरून दोघांमध्ये नेहमीच वाद व्हायचे. अखेर या वादाचा शेवट दोघांच्या आत्महत्येने झाला. यात मात्र दीड वर्षाचा सूरज पोरका झाला.

प्रोफेसर कॉलनीत राजेशने मोठा भाऊ घनश्याम यांच्या घराच्या भिंतीच्या सहायाने झोपडी उभारली होती. दाम्पत्य मोलमजुरी करून प्रपंच चालवित होते. परंतु राजेशच्या दारूच्या व्यसनाने त्यांना आणखी दारिद्रय़ाच्या खाईत पाडले. यामुळे दोन्ही वेळेचे जेवणासाठी घरात धान्य व इतर साहित्य राहात नव्हते.

दीड वर्षाच्या तान्हुल्याला काय खायला द्यावे, असा प्रश्न पूनमला पडायचा. यावरून दोघात नेहमीच भांडण व्हायचे. परंतु व्यसनापासून राजेश स्वत:ची सुटका करू शकत नव्हता. दोघेही गरिबीला कंटाळले होते. राजेशला चार भाऊ आहेत परंतु राजेशकडे त्यांचे लक्ष नव्हते.

काल राजेश व पूनमने पोळा साजरा केला. रात्री जेवण झाल्यानंतर सूरजला घेऊन दोघेही झोपले. आज सकाळी ६.३0 वा. त्यांच्या घरी राजेशचे मामा प्रल्हाद गजरे हे राजेशला उठवायला गेले. त्यांनी दार ठोठावले असता प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे त्यांनी घनश्यामला बोलविले. त्याने परिसरातील नागरिकांना गोळा केले. राजेशच्या झोपडीच्या टिनाचे दाराला त्यांनी धक्का दिला असता ते तोडले. आत तिघेही झोपले आढळले. परंतु राजेश व पूनमच्या तोंडातून फेस निघालेला त्यांना दिसला. त्यांनी दोघांना सावनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

घटनास्थळी येऊन पोलिसांनी पंचनामा केला. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दामोधर राठोड करीत आहेत.


अत्यंत हालाखीचे जीवण जनणार्‍या कुटुंबाला शासनाच्या सवलती मिळत नाही. हे सावनेर येथील दाम्पत्याच्या आत्महत्येच्या घटनेवरुन उघडकीस येते. अठराविश्‍व दारिद्रय़ात जीवण जगनार्‍या अनेक कुटुंब शासनाच्या विविध योजनांपासून वंचित आहे. अनेकांना दारिद्रय़ रेषेखालील योजनेचाही लाभ मिळत नाही.

स्थानिक प्रोफेसर कॉलनीजवळील सटवामाता मंदिराजवळील रहिवासी दाम्पत्य राजेश डेरे व पत्नी पूनम झोपडीत राहत होते. भावाच्या घराच्या भिंतीच्या आधारावर झोपडी बांधली. सिमेंटच्या पत्र्याचे छत व टिनाच्या पत्राचा दरवाजा होता. ही झोपडी रात्रीला अंधार कोठडी असायची. नदीजवळ असल्याने साप व विंचूचा नेहमीच हैदोस असायचा. पाऊस पडल्यास या दाम्पत्याला संपूर्ण रात्र जागून काढावी लागत. अशा बिकट परिस्थितीत ते जगत होते. यात राजेशला दारुचे व्यसन. मजूरीचे सर्व पैसे व्यसनात खर्च व्हायचे. राजेशला तीन भाऊ व पाच बहिणी आहेत. सर्वांंची परिस्थिती बेताची आहे. ते हमाली व विट्टभट्टीवर मजूरी करतात. राजेशच्या वडिल नारायण चैताराम डेरे (६३) यांच्याकडे बीपीएलचे कॉर्ड होते. राजेशचा मोठा भाऊ घनशामने दारिद्रय़ रेषेखालील यादीमध्ये स्वत:चा समावेश करण्यासाठी अर्ज केला. यासाठी पैसेही खर्च केले. परंतु काहीही उपयोग झाला नाही, असे घनशामने सांगितले. राजेशनेही बीपीएल कॉर्ड साठी प्रयत्न केले, त्यालाही अपयशच मिळाले.

परिसरातील लोकांना विचारणा केली असता संजय गजरे यांनी अनेक जण खुपच बिकट परिस्थितीत जगत असल्याचे सांगितले. आश्‍चर्याची बाब म्हणजे शासकीय योजनांचा फायदा श्रीमंत लोक घेतात. परिसरातील नत्थू धनोरे, प्रितम गजरे, चंपालाल गजरे आदी गरीब कुटुंब शासनाच्या योजनांपासून वंचित आहे. योजनांचा लाभ मिळावा यासाठी गरीब लोक मजूरी सोडून तहसील कार्यालयात हेलपाट्या मारतात, परंतु पदरी निराशाच पडते.

No comments: