Saturday, August 13, 2011

अण्णांना पाठिंबा देण्यासाठी उपोषणाचा निर्धार-लोकसत्ता


अण्णांना पाठिंबा देण्यासाठी उपोषणाचा निर्धार-लोकसत्ता
नागपूर, १२ ऑगस्ट / प्रतिनिधी

http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=176479%3A2011-08-12-19-16-38&catid=45%3A2009-07-15-04-01-33&Itemid=56#.TkYE7RGDoRs.facebook

जनलोकपाल
विधेयकासाठी १६ ऑगस्टपासून दिल्लीमध्ये बेमुदत उपोषणास बसणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पाठिंबा देण्यासाठी विदर्भातील आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या विधवा, शेतकरी आणि आदिवासी टप्प्याटप्प्याने प्रत्येक ग्रामपंचायतीसमोर उपोषण करणार आहेत.
विदर्भ जनआंदोलन समितीची नुकतीच बैठक झाली. त्यात अण्णाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. देशात सगळीकडे पसरलेला भ्रष्टाचार, सरकार व नोकरशाहीचा अनागोंदी कारभार याला लगाम लावण्यासाठी कायदा करावा व त्यात देशातील सर्वोच्च पदावरील व्यक्तींचा समावेश असावा या मागणीसाठी अण्णा हजारे गेल्या अनेक दिवसांपासून सरकारविरुद्ध लढा देत आहेत. मात्र अण्णाच्या या आंदोलनाकडे सरकार गांभीर्याने बघत नसल्यामुळे १६ ऑगस्टचे त्यांचे उपोषण म्हणजे दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई आहे. यात विदर्भातील आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विधवा व गेल्या ६० वर्षांंपासून सरकारच्या उदासीन धोरणाचे बळी पडलेले, अन्न सुरक्षा आणि आरोग्य या मुलभूत सवलतीपासून वंचित राहिलेले हजारो आदिवासी सहभागी होणार असल्याचा दावा विदर्भ जनआंदोलन समितीने केला आहे.
देशातील भ्रष्टाचार हाच विदर्भातील शेतक ऱ्यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरला आहे. आत्महत्या थांबविण्यासाठी पाठविलेले ५ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांपर्यंत पोहचू दिले नाही. चौकशीचे अहवाल येऊन कोणत्याही राजकीय नेत्यांवर व अधिकाऱ्यांवर कारवाई केली जात नाही. देशात भ्रष्टाचार अधिक वाढतो आहे. शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार आणि आरोग्य क्षेत्रातील भ्रष्टाचार, रोजगाराच्या संधी भ्रष्टाचार व सरकारी कामात होत असलेली दिरंगाई व भ्रष्टाचार याला राजकीय नेत्यांचे भ्रष्टाचार कारणीभूत असून ही भ्रष्ट व्यवस्था बदलणे काळाची गरज आहे. त्यामुळे अण्णा हजारेंच्या आंदोलनात विदर्भातील जनतेनी सहभागी व्हावे, असे आवाहन जनआंदोलन समितीने केले आहे.
१५ ऑगस्टला विदर्भातील प्रत्येक गावात जनतेने एक तास अंधार करावा व १६ ऑगस्टला मशाल मोर्चा काढावा यासाठी गावामध्ये जागृती केली जात असल्याचे किशोर तिवारी यांनी सांगितले.

No comments: