Sunday, January 13, 2013

केंद्र शासनाने शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली- विदर्भात भीषण पाणीसंकट

केंद्र शासनाने शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली
विदर्भात भीषण पाणीसंकट
स्थानिक प्रतिनिधी/ यवतमाळ 
विदर्भात जानेवारीतच दोन हजारच्यावर खेड्यात पिण्याच्या पाण्याची भिषण टंचाई जाणवत असून येत्या मार्चपर्यंत २0 हजारच्यावर खेड्यात पिण्याच्या पाण्याचे संकट येणार आहे. पाण्याची पातळी कमालीची खाली जात आहे. अशा परिस्थितीत उपलब्ध पाणी उद्योग व सिंचनासाठी वापरण्यात येत असून नियोजनशून्य प्रशासन कोणतीच कारवाई करण्यास गंभीर नाही. ग्रामीण अर्थव्यवस्था लागू करण्यासाठी विदर्भ जन आंदोलन समितीने ठोस कार्यक्रम दिला आहे. मात्र यावर आघाडी सरकारने कोणतीही कारवाई केली नाही. याकडे राज्यकर्त्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केली आहे. 
केंद्रसरकारने टंचाईग्रस्त भागात दुष्काळ निवारण करण्यासाठी जाहीर केलेल्या ७७८ कोटीच्या मदतीमध्ये विदर्भाच्या तोंडाला पाने पुसण्यात आल्याचा आरोप विदर्भजन आंदोलन समितीने केला आहे. 
संपूर्ण विदर्भातील कोरडवाहू कापूस, सोयाबीन व तूर उत्पादक शेतकर्‍यांसोबत धान उत्पादक शेतकरीही प्रचंड नापिकीला तोंड देत आहेत. विदर्भातील ५२ लाख हेक्टर मधील कापूस, धान व सोयाबीनला सुरुवातीला पाऊस उशीरा आल्याने तर नंतर जास्त पावसाने तर आता पर्यावरणाच्या प्रचंड बदलावाने नापिकीला तोंड द्यावे लागत आहे. प्रशासनाने या गंभीर परिस्थितीकडे लक्ष न देता विदर्भातील ४0 लाख शेतकर्‍यांवर आलेल्या आर्थिक संकटाचा कोणताही अहवाल सादर केला नाही. या उलट सर्वच जिल्हाधिकारी विदर्भात ६0 टक्के पीक आल्याचा प्रारंभिक अहवाल तयार करत आहे. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या मदतीमध्ये शेतकर्‍यांची निराशाच करण्यात आली असून आत्महत्येची संख्या वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. 
विदर्भातील नापिकीग्रस्त कापूस धान, सोयाबीन व तूर उत्पादक शेतकर्यांना कमीत कमी प्रती हेक्टरी २0 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, ९0 टक्के शेतकरी पीक कर्ज फेडण्यास असर्मथ असून अशा शेतकर्‍यांना नवीन पीककर्ज देण्यासाठी योजना राबवावी, रोहयोची कामे शेतकर्‍यांच्या शेतात करण्यास सरकारने तात्काळ परवानगी द्यावी, उपासमारीला तोंड देत असलेल्या शेतकर्‍यांना अन्न सुरक्षा व आरोग्य सुरक्षा तत्काळ द्यावी, अशी मागणी विदर्भ जनआंदोलन समितीचे किशोर तिवारी यांनी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे निवदेनाद्वारे केली आहे. *

No comments: