Tuesday, November 15, 2011

शेतकर्‍यांच्या मागण्यांसाठी १२ डिसेंबरला विधान भवनावर मोर्चा

शेतकर्‍यांच्या मागण्यांसाठी १२ डिसेंबरला विधान भवनावर मोर्चा

स्रोत: तरुण भारत तारीख: 11/15/2011 11:32:00 PM

कापूस आणि धान उत्पादक

नागपुरातील सर्वपक्षीय बैठकीत निर्णय

विशेष प्रतिनिधी

नागपूर, १५ नोव्हेंबर

कापूस आणि धान उत्पादक शेतकर्‍यांच्या मागण्यांसाठी विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे १२ डिसेंबरला विधान भवनावर भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय आज नागपुरात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला.

सरकारने शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही या बैठकीतून देण्यात आला.

आकाशवाणी चौकातील सरपंच भवनात माजी मंत्री आणि माजी प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष रणजित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला शिवसेनेचे आ. आशीष जैस्वाल, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस गंपू घाटोळे, बाबुराव तिडके, बाबुराव झाडे, किशोर तिवारी, माजी आमदार सेवक वाघाये, देवराव भांडे, हुकुमचंद आमधरे, चंद्रपाल चौकसे, हर्षवर्धन निकोसे, रामराव वानखेडे, अरविंद बोंद्रे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

विदर्भातील कापूस आणि धान उत्पादक शेतकर्‍यांच्या स्थितीवर या बैठकीत चर्चा करताना वक्त्यांनी सरकारच्या शेतकरीविरोधी भूमिकेवर जोरदार हल्ला चढवला. आंदोलन केल्याशिवाय सरकार शेतकर्‍यांना काही देत नाही, याचा उल्लेख करत आंदोलनाच्या कार्यक्रमाची घोषणाही यावेळी करण्यात आली.

कापसाला प्रति क्विंटल ७५०० रु., धानाला २५०० रु. आणि सोयाबीनला ३६०० रु. आधारभूत भाव देण्याची मागणी करणारा ठराव बैठकीत एकमताने पारित करण्यात आला.

कापूस व धान खरेदी केंद्रे येत्या आठ दिवसात सर्व ठिकाणी सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. शेतकर्‍यांना पूर्ण दाबाने वीज मिळाली नाही तर महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा ही यावेळी देण्यात आला.

या मागण्यांसाठी संपूर्ण विदर्भात आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार २१ नोव्हेंबरला विदर्भातील सर्व तालुकास्थानी धरणे आंदोलन केले जाणार आहे. २८ नोव्हेंबरला तहसील कार्यालयावर तर ५ डिसेंबरला सर्व जिल्हास्थानी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असे रणजित देशमुख यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

१२ डिसेंबरला हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संपूर्ण विदर्भातील शेतकर्‍यांचा विधान भवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा सर्वपक्षीय राहणार आहे, सर्व राजकीय पक्षांनी या मोर्चात सहभागी व्हावे या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

कॉंग्रेस नेतेही आजच्या बैठकीत सहभागी होणार होते, मात्र प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मुंबईत तातडीची बैठक बोलवल्यामुळे कॉंग्रेसच्या नेत्यांना त्या बैठकीला जावे लागले, त्यामुळे ते या बैठकीला उपस्थित राहू शकले नाही, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.

भारनियमनामुळे शेतकर्‍यांचे अतिशय नुकसान होत आहे. त्यामुळे कोणत्याही स्थितीत शेतकर्‍यांसाठी दिवसा ४ तास आणि रात्री चार तास या प्रमाणे आठ तास वीजपुरवठा करण्यात यावा, जेणेकरून शेतातील पिकाला पाणी देता येईल, अशी मागणी देशमुख यांनी केली.

किशोर तिवारी

यंदा विदर्भातील खरीपाच्या सर्वच पिकांची स्थिती अतिशय ़खराब आहे. सर्व पिके मिळून १० हजार कोटी रु. चे नुकसान झाले आहे, असे विदर्भ जनआंदोलन समितीचे किशोर तिवारी यांनी सांगितले.

यंदा थंडी लांबल्यामुळे रब्बीच्या पिकांनाही त्याचा फटका बसला आहे, याकडे लक्ष वेधत कोणत्याही पक्षाने शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाचे राजकारण क़रू नये, असे आवाहन तिवारी यांनी केले.

या बैठकीला बशीर पटेल (भंडारा), कोमलचंद्र राऊत, सुरेश पर्बत, सुरेश बांद्रे, दिनकरराव राऊत, दिलीप हिवरकर, प्रभाकर शास्त्री, दिनानाथ राऊत, रूपराव राऊत, शिशुपाल यादव, वीरेंद्र गजभिये, अरविंद बावनकर, रमेश चरपे, पुरुषोत्तम शहाणे व रमेश देऊळकर उपस्थित होते.

No comments: