Friday, September 9, 2011

कापूस भाववाढीसाठी गाव तेथे उपोषण-विदर्भ जनआंदोलन समितीचे आंदोलन

कापूस भाववाढीसाठी गाव तेथे उपोषण-विदर्भ जनआंदोलन समितीचे आंदोलन
स्रोत: तरुण भारत तारीख: 9/5/2011 10:02:38 PM
शहर प्रतिनिधी

यवतमाळ, ५ सप्टेंबर

कापसाचा हमीभाव ६ हजार रुपये क्किंटल करावा या पणन महासंघाच्या मागणीला विदर्भ जनआंदोलन समितीने पाठिंबा दिला आहे. सोबतच कापसाच्या भाववाढीसाठी सोमवार, १२ सप्टेंबरपासून ‘गाव तेथे उपोषण सत्याग्रह’ आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाने केंद्र सरकारला कापसाचा हमीभाव ६ हजार रुपये प्रति क्किंटल करावा व कापसाची निर्यात कायम खुली करावी, असा ठराव भारत सरकारकडे पाठवून कापूस उत्पादक शेतकर्‍यांना वाचविण्यासाठी अशाप्रकारचा निर्णय त्वरित घेणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. कापूस उत्पादक शेतकर्‍यांच्या हक्कासाठी लढणार्‍या विदर्भ जनआंदोलन समितीने पणन महासंघाच्या या दोन्ही मागण्यांचे समर्थन केले असून, कापसाचा हमीभाव ६ हजार रुपये प्रती क्किंटल व्हावा या मागणीसाठी ‘गाव तेथे उपोषण सत्याग्रह’ सुरू करण्याची घोषणा विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केली आहे. विदर्भाच्या कापूस उत्पादक शेतकर्‍यांच्या वतीने पणन महासंघाचे अध्यक्ष डॉ. एन. पी. हिराणी यांनी पुढाकार घेऊन कापूस उत्पादक शेतकर्‍यांच्या हिताकरिता हमीभाव व निर्यात धोरणाच्या चुकीच्या निर्णयाने येत असलेल्या प्रचंड आर्थिक संकटाची कल्पना दिली असून, हमीभाव वाढविण्याची सखोल कारणे व निर्यात धोरणामुळे शेतकर्‍यांचे होत असलेले नुकसान सरकारसमोर मांडले आहे. याकरिता विदर्भ जनआंदोलन समितीने पणन महासंघाचे आभार मानले आहेत. मात्र, केंद्र सरकार हमीभाव व निर्यात धोरणाबद्दल उदासीन असून, यापूर्वी महाराष्ट्र कॉंग्रेस अध्यक्ष माणिकराव ठाकरे व समाज कल्याणमंत्र्यांनी स्वतंत्रपणे कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याकडे कापसाचा हमीभाव ५ हजार रुपये प्रतिक्किंटल करावा, अशी मागणी केली होती. परंतु, केंद्र सरकारने दोन महिने लोटूनही या मागणीची दखल घेतली नाही. पणन महासंघाने आपल्या ठरावात सरकारच्या निर्यातबंदीमुळे मागील वर्षी शेतकर्‍यांचे ३० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची कबुली दिली आहे. यावर्षी कापसावरील लागवडीचा खर्च एकरी २५ ते ३० हजार रुपये येत असताना कापसाचा हमीभाव ३ हजार ३०० रुपये ठेवणे म्हणजे कृषिमूल्य आयोगाने शेतकर्‍यांना आत्महत्येसाठी आमंत्रणच देणे होय, असेही किशोर तिवारी यांनी म्हटले आहे. मागील तीन वर्षांत शेतमजुरांची मजुरी, रासायनिक खते, कीटकनाशक आणि बीटी बियाण्यांच्या किंमती तिपटीने वाढल्या आहेत. या उलट कापसाचे उत्पादन व कापसाचा भाव स्थिर आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले असून सरकारने कापूस उत्पादक शेतकर्‍यांना त्यांच्या घामाचे दाम द्यावे, अशी मागणी समितीने केली आहे.

No comments: