Thursday, July 28, 2011

आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याची मुलगी होणार पत्रकार- आसवांच्या ताटव्यात फुलले अंबर..-लोकमत





आत्महत्याग्रस्त
शेतकर्‍याची मुलगी होणार पत्रकार- आसवांच्या ताटव्यात फुलले अंबर.
.
-लोकमत

(29-07-2011 : 2:08:37)

http://onlinenews1.lokmat.com/php/detailednews.php?id=NagpurEdition-2-2-29-07-2011-9f78c&ndate=2011-07-29&editionname=nagpur
जितेंद्र ढवळे। दि. २८ (नागपूर)-पाच वर्षांची असताना वडिलांनी आत्महत्या केली. छत्र हरविले. कुटुंबावर कर्जाचा डोंगर. घरात चार मुली. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत. घरातील कोपरा नि कोपरा अंधाराने भरलेला. आई सरस्वतीच्या आभाळाएवढय़ा मायेने जगण्याचे बळ मिळाले अन् आसवांच्या या ताटव्यात अंबर फुलले!


हे चित्रपटातील कथानक नसून यवतमाळ जिल्ह्यातील तेलंग टाकळी या खेड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याच्या कुटुंबातील गुणवंत लेकीची ही कहाणी आहे. कर्जाच्या पाशात अडकलेल्या दिवंगत रामदास अंबरवार यांच्या मंजूने आता हातात लेखणी घेत तिच्यासारख्याच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचे वास्तव जगापुढे मांडण्याचा संकल्प केला आहे. यासाठी तिने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागात बॅचरल ऑफ र्जनालिझम अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आहे.

१९९८ मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील तेलंग टाकळी या खेड्यातील रामदास अंबरवार या शेतकर्‍याने कर्जाच्या जाचाला कंटाळत देह त्यागला. मात्र त्याच्या जाण्याने पत्नी सरस्वती आणि चार मुलीचा आधार हरविला. काळोखाच्या या विश्‍वात सरस्वतीने उंबरठा ओलांडला. शेती आणि रोजमजुरी करून कुटुंबाला आधार दिला. १२ वर्षाच्या या वनवासात सरस्वतीच्या सुषमा, मीनाक्षी, जयश्री, मंजू या चार मुलींमुळे घरात विद्या नांदू लागली. मात्र किडनीच्या आजारामुळे ग्रस्त असलेल्या आणि उपाचारासाठी पैसे नसल्याने जयश्रीचा डाव अध्र्यावरच मोडला. सुषमा आणि मीनाक्षीने बारावीपर्यंत शिक्षण घेतले. वडील गेल्यानंतर आत्महत्याग्रस्त कुटुंबाचे वृत्तांकन करणार्‍या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरे देताना आईचे अर्शु टिपणार्‍या मंजूने बी.ए.ची परीक्षा पांढरकवडा येथून उत्तीर्ण केली. मात्र आयुष्याच्या परीक्षेत पास होण्याचा संकल्प गाठणार्‍या या मुलीने काही दिवसांपूर्वीच नागपूर गाठले. विद्यापीठाच्या जनसंवाद विभागाची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आणि जनसंवाद पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. पत्रकारितेची पदवी पूर्ण केल्यानंतर विदर्भातील खेड्यापाड्यात जाऊन शेतकर्‍यांचे विदारक वास्तव जगापुढे मांडत विकासाचा अंबर फुलविण्याचे ध्येय मंजूने डोळ्यासमोर ठेवले आहे. आपल्या बापासारख्या हजारो दुर्दैवी शेतकर्‍यांचे प्राक्तन मंजूला जगासमोर मांडायचे आहे. नागपुरातील शिक्षणाचा खर्च, राहायचे कुठे, हा खर्च झेपेल का? असे अनंत प्रश्न तिच्यासमोर सध्या आहेत. पण कर्जाच्या ओझ्याखाली कोणत्याही शेतकर्‍याने आपला जीव गमावू नये, यासाठी काही मला पत्रकारितेच्या माध्यमातून करता येईल का? हा प्रश्न मात्र मंजूला मोठा वाटतो. रामदास अंबरवार या शेतकर्‍याला कुणाचाच आधार नव्हता.

ना समाजाचा, ना सरकारचा म्हणूनच त्याने आत्महत्या केली. आज या दिवंगत शेतकर्‍याची लेक हजारो शेतकर्‍यांचे प्राण वाचविण्यासाठी काही तरी करू इच्छिते. तिच्या वडिलांना आपण मदत करू शकलो नाही. तिच्यासाठी काही करता येईल का? मंजू अंबरवार : ९५५२७२६९५२

No comments: