मीनाक्षी दहिवलेंची हत्या.. या प्रवृत्ती ठेचून काढा! चंद्रकांत ढाकुलकर भंडारा जिल्ह्य़ातील अडय़ाळजवळ गोलेवाडी गावात दारूबंदीसाठी गेलेल्या कार्यकर्तीचा दारू विक्रेत्या महिलेने गळा दाबून खून केल्यामुळे साऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या असुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गोलेवाडी हे तंटामुक्तीसाठी पुरस्कार प्राप्त गाव आहे, हे विशेष. अशा गावात दारू अड्डे राजरोसपणे सुरू रहावेत, हे या पुरस्कारवर धब्बा लावणारी बाब आहे. तंटा-वखेडा तर दूरच, पण प्रत्यक्ष खूनच केला जावा, ही सामाजिक क्षेत्रासाठी चिंतनीय बाब ठरली आहे. त्यातही चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, भंडारा, वर्धा अन् विदर्भाच्या अन्य कानाकोपऱ्यात दारूबंदीसाठी वातावरण निर्माण होत असताना असे अघटित घडावे, ही या चळवळीलाही धक्का पोहोचवणारी घटना ठरली आहे. या प्रवृत्ती वेळीच ठेचल्या तरच ठीक. अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांच्यासारख्या अधिकाऱ्याला जिवंत जाळले जाते, त्याही आधी पुण्याजवळ अण्णा हजारेच्या भ्रष्टाचार निर्मूलनाच्या चळवळीतीलकार्यकर्त्यांचा सतीश शेट्टी यांचा निर्घृण खून केला जावा, दारूबंदी आंदोलनातील कार्यकर्त्यांंवर मारेकरी सोडले जावे, उमरेडजवळ राजूरवाडीसारख्या लहानशा पारधी गावात पोलिसांनी पन्ना राजपूतसारख्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांसह साऱ्या पारध्यांना रॉकेल माफिया ठरवून अन्याय अत्याचार केला जावा, ही वस्ती उद्ध्वस्त करावी, ही सारी कशाची लक्षणे समजावी, याचे उत्तर संबंधितांनी दिली पाहिजे. भरीस भर म्हणून की काय, परवा नागपुरात अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीचा भरदिवसा शेकडो लोकांसमक्ष निर्घृण खून करण्यात आल्याने समाजमन सून्न झाले आहे. नागपुरातील गेल्या महिन्याभरातील घटना बघता या शहरावर पोलिसी वचक राहिला आहे, असे अजिबात म्हणवत नाही. साऱ्या विद्याíथनींसह पालकांना या घटनेने घोर लावलेला आहे. त्यातही परगावाहून शिकण्यासाठी शहरात येणाऱ्या विद्याíथनी आणि त्यांच्या पालकांची या घटनेने झोप उडवलेली आहे. आता कुठे सावित्रीच्या लेकीबाळी शिक्षणासाठी उंबरठा ओलांडून घराबाहेर पडू लागलेल्या असतांनाच असे घडावे, यामुळे त्यांच्या प्रगतीला खीळ बसतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय व राणी बंग यांनी दारूबंदीसाठी गडचिरोली जिल्ह्य़ात आवाज बुलंद केला, पण त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करणाऱ्या या शासनाच्या कानापर्यंत तो आवाज काही अद्याप पोहोचलेला नाही. विधिमंडळाच्या गेल्या हिवाळी अधिवेशनात याचसाठी श्रमिक एल्गार या संस्थेच्या वतीने १०५ किलोमीटरची सुमारे ५ हजार महिला कार्यकर्त्यांची पदयात्रा काढली. डॉ. राणी बंग आणि श्रमिक एल्गारच्या पारोमिता गोस्वामी या खंद्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा विधिमंडळावर धडकली होती. नुकतीच दारूबंदीच्या कारणमीमांसेसाठी समिती स्थापन करण्यात आली, पण त्यात महिलांचा समावेश करण्यात आलेला नव्हता. त्यावरून धुसफूस झाल्यावर आता त्यांचा समावेश करण्याचा विचार पुढे आला आहे. या उशिरा सुचलेल्या शहाणपणामुळे शासनाला ढोपरापासून हात जोडावेसे वाटते. दारूच्या व्यसनामुळे संसाराची राखरांगोळी झालेले हजारो कुटुंबे आहेत. त्याची झळ प्रत्यक्ष महिलांनाच बसलेली असतानाही दारूबंदीवर विचार करणाऱ्या समितीत महिलांनाच डावलण्याची हिंमत शासन करते म्हणजे काय, याचे उत्तर अजूनही कुणी दिलेले नाही. नाही तरी, या देशातील समस्त महिलांच्या खाण्यापिण्याच्या आणि जगण्याचेही निकष या पुरुषप्रधान समाजव्यवस्थेने आजवर घेतलेले आहेत. या हाडमासाच्या जीवाला त्यांनी फक्त गृहीत धरलेले आहे, असेच यावेळीही झाले. स्त्री मनाचा थांग लागत नाही, असे मानसरोगतज्ज्ञ डॉ. सिग्मंड फ्राइड यांनी सांगून ठेवल्यानंतरही या पुरुषप्रधानतेला आजवर जाग म्हणून आलेली नाही. चंद्रपूर जिल्ह्य़ात दारूबंदीसाठी वातावरण पेटलेले असताना आणि महिलांमध्ये कमालीची जागृती होत असतानाच काही गावांमध्ये त्यांना हुसकावून लावण्यात आलेले आहे. म्हणजे इकडे दारूडय़ा नवरा घरात छळतो अन् बाहेर समाज, असा हा दुहेरी छळ केवळ या चळवळीतल्या महिलांच्या वाटेला आलेला आहे. आता गोलेवाडीतील अवैध दारूविक्री रोखण्यासाठी गेलेल्या गावातील महिला मंडळ, बचत गट, ग्रामपंचायत समितीच्या ३००-४०० महिला कार्यकर्त्यांवर हा हल्ला झालेला होता. या लहानशा तंटामुक्ती पुरस्कारप्राप्त गावात ४०-४५ दारूअड्डे सुरू होते. ते बंद पाडायचे होते, पण एका महिला दारूविक्रेतीने या कार्यकर्त्यांच्या डोळ्यात तिखट फेकून मीनाक्षी दहिवले या कार्यकर्तीचा चक्क गळा घोटला. त्या जागीच मरण पावल्याने या चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ठसठशीतपणे अधोरेखित झाला आहे. या कार्यकर्त्यां तर दूरच पण, काही दिवसांपूर्वी या दारूविक्रेत्यांनी पोलिसांनाही मारहाण करून हुसकावून लावल्याची माहिती आहे. एका कार्यकर्त्यांच्या घरावर दगडफेक करण्यात आलेली होती. ही असुरक्षितता वाढत जाणारी आहे. याला वेळीच ठेचले तर मागच्यास ठेच पुढचा शहाणा होण्याची थोडी तरी शक्यता आहे. नाही तर, सारेच मुसळ केरात. शासनाला मात्र यातून मिळणाऱ्या कोटय़वधी रुपयांचा मलिदा ओरपण्यात स्वारस्य आहे, हे लक्षात घ्यावे. |
No comments:
Post a Comment