Wednesday, March 9, 2011

संपूर्ण दारूबंदीसाठी हजारो महिलांचे जिल्हाधिकाऱ्यांसमोर धरणे-लोकसत्ता


संपूर्ण दारूबंदीसाठी हजारो महिलांचे जिल्हाधिकाऱ्यांसमोर धरणे-लोकसत्ता Print
यवतमाळ, ८ मार्च / वार्ताहर
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जिल्ह्य़ातील हजारो महिलांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देऊन यवतमाळ जिल्ह्य़ात संपूर्ण दारूबंदीची मागणी केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज दारूबंदी अभियान व सावित्रीबाई फुले, बचत गट कर्जमुक्ती आंदोलन या मागण्यांसाठी विदर्भ जनआंदोलन समिती, विदर्भ राज्य संघर्ष समिती, राष्ट्रीय स्वाभिमान ट्रस्टसह अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ यांनी संयुक्तपणे महिलांचे आंदोलन आज केले.
जिल्हाभरातून मोठय़ा संख्येने महिलांशी आंदोलनात सहभागी होण्याआधी मिळेल त्या वाहनाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर जमा झाल्या होत्या. प्रारंभी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भजनाने आंदोलनास सुरुवात झाली. प्रत्येक गावात दारूने हैदोस घातला आहे, शाळा नाही, पण दारूचे दुकान या गावात आहे. मात्र, सरकारला महसूल मिळतो, या कारणाने सरकार त्याकडे दुर्लक्ष करून दारूपासून मिळणारा महसूल कसा वाढेल, याचाच प्रयत्न करत आहे. यापुढे मात्र हे चालणार नाही, असा इशारा यावेळी बोलताना क्रांती धोटे यांनी दिला. विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी चंद्रपूर जिल्ह्य़ात दारूबंदीचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमली, पण दारूचे प्रचंड दुष्पपरिणाम दिसत आहे. हजारो कुटुंब उध्वस्त होत आहे. त्याचा अभ्यास ही समिती काय करणार आहे? सर्व चित्र उघड आहे. म्हणून समिती नको थेट दारूबंदी करा, असे तिवारी म्हणाले. १ मे पूर्वी जिल्ह्य़ात सर्वत्र दारूबंदी झाली नाही तर प्रत्येक गावात दारूबंदीच्या विरोधात जोरदार आंदोलन सुरू होईल असे तिवारी म्हणाले.
कोणत्याही कर्जमाफी व व्याजमाफीच्या सवलतीमध्ये बचत गटांचा समावेश करण्यात आला नाही. अनेक बचत गटांना त्यांच्याजवळ चारा पाणी व इतर सुविधा नसतानाही पशुपालन मेंढपाळ उद्योग असे शेतीला पूरक उद्योग शासकीय अधिकाऱ्यांनी दिले. आज या बचत गटावर आर्थिक संकट पसरले आहे. त्यांना जर कर्जमाफी दिली नाही तर शेतकऱ्यांच्या बरोबरच या बचत गटाचे सदस्यही मोठय़ा संख्येने आत्महत्या करतील, असा इशारा तिवारी यांनी दिला. यावेळी राष्ट्रीय स्वाभिमान ट्रस्टचे दिनेश राठोड, अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे अशोक ठाकरे यांनीही विचार व्यक्त केले.
या धरणे कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्रमिक एल्गार संघटनेच्या पारोमिता गोस्वामी, यांनी दारूबंदी करण्याची इच्छा शासनाची दिसत नाही. आम्ही दारूबंदीसाठी कायदे केले, असे सहकार सतत सांगत असते. या महिलांबाबत अधिकार दिल्याचे वारंवार सांगितले जाते मात्र, दारूबंदीसाठी कार्य करणाऱ्या महिलांची अवस्था अत्यंत वाईट असल्याचे गोस्वामी म्हणाल्या. दारूबंदीसाठी गावात दारू दुकानदार मतदान होऊ देत नाही. महिलांनी या आंदोलनातून मागे हटावे म्हणून त्यांना त्रास दिला जातो. म्हणून दारूबंदीच्या विरोधात सर्व महिलांनी संघटित व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. या आंदोलनाचे संचालन मोहन जाधव यांनी केले. आंदोलनानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

No comments: