विदर्भ जनआंदोलन समितीची टीका-लोकसत्ता
मुख्यमंत्री चव्हाण व कृषी मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत आज मुंबईत रौप्य महोत्सव
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=117817:2010-11-27-18-07-43&catid=45:2009-07-15-04-01-33&Itemid=56
नागपूर, २७ नोव्हेंबर/प्रतिनिधी
ज्या पणन महासंघाने भ्रष्टाचाराचा कळस गाठून महाराष्ट्र सरकारला ५ हजार कोटीचा चुना लावला व कापसाचा अग्रिम बोनस बंद करुन शेतकऱ्यांच्या आत्महत्येला वाट मोकळी केली, त्या पणन महासंघाने रौप्य महोत्सव साजरा करणे म्हणजे ३० लाख नैराश्यग्रस्त व कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणे होय, अशी प्रतिक्रिया विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून या पणन महासंघाने यावर्षी एकही किलो कापूस घेतला नाही व त्या पणन महासंघाचा प्रशासकीय कारभार व इतर कामासाठी कोटय़वधीचा खर्च होत असताना जर पणन महासंघ कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देत नसेल, तर या रौप्य महोत्सवी वर्षांतच या पणन महासंघाचे विसर्जन करावे, अशी मागणीही त्यांनी केली.
कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी व कापसाच्या बोंडापासून कापड तयार करण्याच्या प्रक्रियेपर्यंत शेतकऱ्यांच्या मालकीची संस्था तयार करण्याच्या उद्देशाने सरकारने कापूस एकाधिकार योजनेमध्ये निर्माण केलेल्या महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाच्या स्थापनेचा रौप्य महोत्सवी सोहोळा उद्या, २८ नोव्हेंबरला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व कृषीमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत साजरा होत आहे, हे विशेष.
पणन महासंघाचा रौप्य महोत्सव साजरा करताना आघाडी सरकारने कापसाला ४ हजार ५०० रूपये प्रति क्विंटल भाव द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. एकीकडे खासगी व्यापारी दररोज कापसाचे भाव पाडत आहेत आणि त्यावरही समाधान झाले नाही तर काटय़ामध्ये कमी वजन दाखवून खुलेआम शेतकऱ्यांची लूट करत आहेत. जगात कापसाला ५ हजार रुपये प्रति क्विंटल भाव असताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व कृषीमंत्री शरद पवार याविषयी का बोलत नाहीत, असा सवालही समितीने केला आहे. ज्या पणन महासंघाने केंद्र सरकारला कापसाचा हमी भाव ४ हजार रूपये प्रति क्विंटल व्हावा, अशी मागणी केली आहे, त्या पणन महासंघाला विशेष निधी देऊन ४ हजार रूपये प्रति क्विंटल दराने कापसाच्या खरेदीची सुरुवात का केली जात नाही, असेही समितीने सरकारला विचारले आहे.
महाराष्ट्रात पणन महासंघाचा रौप्य महोत्सव समारंभ व १ डिसेंबरला नागपुरात सुरू होणारे अधिवेशन याचे निमित्त साधून महाराष्ट्र सरकारने ओल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रति एकरी १० हजार रूपये मदत व पणन महासंघाद्वारे कापसाची खरेदी किमान ४ हजार ५०० रूपये प्रति क्विंटल दराने करुन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणीही समितीने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.
No comments:
Post a Comment