Saturday, April 6, 2013

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबासाठी आशेचा किरण

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबासाठी आशेचा किरण
विदर्भात २00२ पासून हजारो शेतकर्‍यांनी आपली जीवनयात्रा संपविली. त्यामुळे हजारो शेतकरी कुटुंबांची घडी विस्कटली. कुटुंबातील कर्ता माणूसच गेल्याने त्या कुटुंबातील मुलांमुलींच्या शिक्षणाची परवड झाली. तर विस्कटलेल्या कुटुंबाची घडी कशी बसवायची? असा यक्षप्रश्न शेतकरी विधवांसमोर निर्माण झाला. अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन या कुटुंबांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष व शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबासाठी शासनाकडून किंवा सामाजिक संस्थांकडून मदत कशी मिळवून देता येईल, यासाठी अगदी सुरुवातीपासून प्रयत्न सुरू ठेवलेत. त्यांच्या प्रयत्नामुळेच अनेक शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाना शासनाची मदतही मिळाली. परंतु, त्या तुटपूंज्या मदतीतून कुटुंब सावरणे शक्य होत नाही. विस्कटलेली घडी बसविण्यासाठी शेतकरी विधवेला काम मिळायला हवे आणि मुलांना शिक्षण आणि प्रशिक्षण उपलब्ध होणे अतिशय महत्त्वाचे आहे. हे हेरूनच त्यांनी शेतकरी विधवा व त्यांच्या मुलांना विविध व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यासाठी समाजातील काही दातृत्वाचा शोध घेतला.
आखाती देशात राहत असलेल्या कृष्णा टावरी यांना विदर्भातील शेतकर्‍यांच्या दयनीय स्थितीची त्यांनी जाणिव करून दिली. त्यांच्या सहकार्यातून अमरावती जिल्हय़ातील घुईखेड येथे शेतकरी विधवा आणि त्यांच्या मुलांसाठी संगणक प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात आली. शासनाचे कोणतेच अनुदान न घेता टावरींच्या आर्थिक सहकार्यातून घुईखेड येथे संगणक प्रशिक्षण वर्ग सुरू झाले. यवतमाळातील उच्चशिक्षित संगणक प्रशिक्षकांकडून संगणक केंद्रावर शेतकरी विधवा आणि त्यांच्या मुलांना प्रशिक्षित करण्याचे काम मागील एक वर्षापासून सुरू आहे. या परिसरातील शेकडो महिला आणि मुलामुलींना संगणक साक्षर होण्याची संधी किशोर तिवारी यांच्या पुढाकारामुळे उपलब्ध झाली.
संगणकाचे प्रशिक्षण घेऊन त्यांनी रोजगार उभारावा, शासकीय निमशासकीय नोकरीत संगणकाचे ज्ञान उपयोगी यावे, हा या मागील उदात्त हेतू आहे. राज्याचे माजी पोलिस महासंचालक अनामी रॉय यांच्या वंदना फाऊंडेशन व एनआयआयटीच्या संचालक रिना सिन्हा यांच्या पुढाकारातून विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवा आणि मुलामुलींसाठी संगणक प्रशिक्षण देण्यासाठी वर्धा आणि यवतमाळ जिल्हय़ातील पांढरकवडा येथे नवीन प्रकल्प त्यांनी सुरू केला आहे. कालच पांढरकवडा या आदिवासीबहुल तालुक्याच्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या उपस्थितीत या प्रशिक्षण केंद्राचे उद््घाटन झाले.
रॉय यांनी या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून हजारो शेतकरी विधवा व त्यांच्या मुलांना संगणकाचे प्रशिक्षण देण्याचा संकल्प सोडला आहे. संगणकाचे प्रशिक्षण देऊनच भागणार नाही म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी इंग्रजी भाषेचे ज्ञान व्हावे म्हणून इंग्लिश स्पिकिंगचे वर्गही चालविले जाणार आहेत. सेवानवृत्त झाल्यानंतर रॉय यांनी भारत सरकारने दिलेल्या महत्त्वाच्या हुद्दय़ावर न जाता आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासाठी काम करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी वंदना फाऊंडेशन या संस्थेची स्थापना २0१0 मध्ये केली. मागील दोन वर्षात वर्धा व यवतमाळ जिल्हय़ातील कित्येक शेतकरी विधवांना विविध उद्योगांचे प्रशिक्षण दिले. शेकडो विधवांना आपला उद्योग यशस्वीपणे सुरू करता आला.
शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाची विस्कटलेली घडी पुन्हा बसवायची असेल तर त्या कुटुंबातील विधवांच्या हाताला काम आणि त्यांच्या मुला-मुलींना दज्रेदार शिक्षण देणे अत्यंत आवश्यक आहे. छोट्या छोट्या उद्योगांचे प्रशिक्षण, व्यावसायिक ज्ञान उपलब्ध करून दिल्यास शेतकरी विधवा आपल्या कुटुंबाचा गाडा सर्मथपणे चालवू शकतात, असा विश्‍वास रॉय यांना आहे. त्पांढरकवडा येथून या कार्याची सुरुवात करण्यात आली आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबासाठी हे प्रशिक्षण केंद्र आशेचा किरणच ठरणार आहे! *

No comments: