Thursday, May 17, 2012

यवतमाळ जिल्ह्यातील २३३ तलावात ठणठणाट-लोकमत

यवतमाळ जिल्ह्यातील २३३ तलावात ठणठणाट-लोकमत 
यवतमाळ। दि. १६ (शहर वार्ताहर) दरवर्षी जिल्ह्यामध्ये मुबलक प्रमाणात पाऊस पडत असला तरी उन्हाळा येताच प्रकल्पातील जलसाठा झपाटयाने कमी होतो. यावर्षी पाण्याच्या पातळीत कमालीची घसरण नोंदविण्यात आली आहे. परिणामी जिल्ह्यातील २३३ तलाव कोरडे पडले आहे. याच कारणाने जिल्ह्यात पाणी टंचाईचे सावट अधिक गडद झाले आहे.
लोकप्रतिनीधींचे दुर्लक्ष आणि प्रशासकीय यंत्रणेच्या दिरंगाईने जलप्रकल्पांचे नियोजन पूर्णत: कोलमडले आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांपुढे पेयजलासह कृषी सिंचनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाचे ३८६ प्रकल्प आहे. त्यामध्ये ६९ सिंचन तलाव, २३६ पाझर तलाव, ७८ गाव तलाव तर तीन साठवण तलाव आहे. सध्यस्थितीत यातील २३३ तलाव कोरडे पडले आहेत. १५३ तलावामध्ये ८ टक्के जलसाठा उरलेला आहे.
यापेक्षाही भयंकर स्थिती पाटबंधारे विभागाच्या सिंचन प्रकल्पांची आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प म्हणून पुस प्रकल्प ओळखला जातो. या प्रकल्पात १४ टक्के पाणी शिल्लक आहे. पाच मध्यम प्रकल्पामध्ये ३३ टक्के पाणी शिल्लक आहे. तर बोरगाव या मध्यम प्रकल्पामध्ये 0.२५ टक्केच जलसाठा शिल्लक आहे.
पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत येणार्‍या ६२ लघु प्रकल्पामध्ये केवळ ८.४८ टक्केच पाणी शिल्लक आहे. यातील १८ प्रकल्प पूर्णत: कोरडे पडले आहे. त्यामध्ये नेर तालुक्यातील उर्मडा, लोहतवाडी, नेर प्रकल्प पूर्णत: कोरडा आहे. राळेगाव तालुक्यातील एकलारा, झोटींगधर, दिग्रस तालुक्यातील देवगाव, रूई आणि ईटाळा. यवतमाळ तालुक्यातील दुधगाव आणि घोटाणा. मारेगाव तालुक्यातील म्हैसदोडका, रामपूर, खडकडोह आणि खंडणी, झरी तालुक्यातील पवनार, वणी तालुक्यातील बोरडा उमरखेड तालुक्यातील तरोडा आणि पोफाळी या प्रकल्पामध्ये पाण्याचा थेंबही नाही. यामुळे जनावरांच्या पेयजलाचा प्रश्न बिकट झाला आहे.
जलप्रकल्पाचा स्रोत खाली गेल्याने पाणी समस्या उद्भवली आहे. याच कारणाने सहा तालुक्याची भूजल पातळीत घसरण झाली. घाटंजी आणि राळेगाव तालुक्याची स्थिती सर्वाधिक चिंताजनक आहे. या दोन्ही तालुक्यात गतवर्षी १७ टक्के कमी पावसाची नोंद करण्यात आली. राळेगाव तालुक्यातील भूजलस्रोतात १.0४ टक्के घट नोंदविण्यात आली आहे तर घाटंजी तालुक्यात १. २४ टक्के भूजल पातळी खाली गेली आहे. त्याचप्रमाणे बाभूळगाव, महागाव, नेर, उमरखेड आणि वणी तालुक्याची भूजल पातळी खालावली आहे.
प्रकल्पाचा गाळ चिंतनाचा विषय
जिल्ह्यातील प्रकल्पामध्ये दरवर्षी मोठया प्रमाणात गाळ वाहुन येतो. दरवर्षी यामध्ये वाढ होत आहे. या कारणाने प्रकल्पाची मुळ क्षमता नष्ट झाली आहे.

No comments: