Tuesday, August 18, 2009

पोळ्याच्या तोंडावर विदर्भातील पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या-सकाळ वृत्तसेवा

पोळ्याच्या तोंडावर विदर्भातील पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, August 19th, 2009 AT 12:08 AM
Tags: nagpur, suicide, farmer
http://beta.esakal.com/2009/08/19000011/vidarbha-nagpur-five-farmer-su.html
नागपूर - कृषिजीवनातील महत्त्वाचा पोळा ऐन तोंडावर आला असताना विदर्भातील तब्बल पाच कास्तकारांनी आज आत्महत्या केल्या. यात नागपूर, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यातील प्रत्येकी एक, तर यवतमाळ जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांचा समावेश आहे.
या पाचही शेतकऱ्यांनी कोणत्या ना कोणत्या बॅंकेतून किंवा आप्तमित्रांकडून शेतीसाठी कर्ज घेतले होते. परंतु, गेल्या महिनाभरात पावसाने लांबलचक चाट दिल्याने पिकांची अवस्था मरणासन्न झाली आहे. त्यातच बहुतांश ठिकाणी उंटअळी, लष्करी अळ्यांनी थैमान घातल्यामुळे सोयाबीन नेस्तनाबूद होत आहे. त्यामुळे यंदा खरीप वाया जाऊन कर्जाची परतफेड शक्‍य होणार नाही, अशी धास्ती या कास्तकारांनी घेतली होती असे समजते. वाढती महागाई पाहून शेतमजूरही निंदण आणि डवरणीसाठी अव्वाच्या सव्वा मजुरी मागत आहेत. या सर्व प्रकाराने नाकीनऊ आलेल्या शेतकऱ्यांना आता पोळ्याचा सण कसा साजरा करावा, हा सवाल सतावतो आहे. बैलांच्या साजाचे साहित्य यंदा दुपटीने महाग झाले आहे. अशा परिस्थिती कास्तकार मानसिकदृष्ट्या खचले आहेत. यंदा उत्पादन घटून कर्ज फेडणे अशक्‍य होण्याच्या भीतीनेच आज पाच कास्तकारांनी आत्महत्येचा मार्ग पत्करल्याचे संबंधित गावांमध्ये बोलले जात आहे.
नेर (जि. यवतमाळ) - तालुक्‍यातील पाथ्रट गोळे येथील रमेश तुळशीराम मरसकोल्हे (वय 50) या शेतकऱ्याने सोमवारी (ता. 17) रात्री 11 वाजताच्या सुमारास विष प्राशन केले. त्यांना तातडीने यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्याजवळ केवळ चार एकर कोरडवाहू शेती होती. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे 60 हजार रुपयांचे कर्ज त्यांच्यावर होते.
मारेगाव (जि. यवतमाळ) - दुबार पेरणीचे संकट, सोसायटी व खासगी कर्जाने विवंचनेत पडलेले पहापळ येथील युवा शेतकरी विजय मनोहर बोधे (वय 32) यांनी रविवारी (ता. 16) विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्याकडे चार एकर शेती होती. पिसगाव येथील आदिवासी सोसायटीचे 22 हजार रुपयांचे व खासगी 15 हजार रुपयांचे कर्ज त्यांनी घेतले होते. त्यांच्या दोन एकरांतील सोयाबीन पूर्णपणे वाळून गेले, तर पाण्याच्या दुष्काळाने कपाशीचीही दुबार पेरणी करावी लागली. त्यामुळे रविवारी रात्री सात वाजता घरामागे जाऊन त्यांनी एन्डोसल्फान घेतले. त्यांना मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
चिमूर (जि. चंद्रपूर) - दुष्काळ आणि नापिकीला कंटाळून तालुक्‍यातील भिसी येथील रामचंद्र लहानू मुंगले (वय 50) या शेतकऱ्याने आज कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. पावसाअभावी खरीप हंगामातील पीक हातून जात असल्याने रामचंद्र मुंगले यांनी आज सकाळी अकराच्या सुमारास आपल्या शेतात आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच नायब तहसीलदार गोहणे यांनी भेट दिली.
आर्वी (जि. वर्धा) - तालुक्‍यातील इठलापूर येथील दिलीप सुरेश नांदणे (वय 32) या शेतकऱ्याने आज आत्महत्या केली. राहत्या घरीच विष प्राशन करून ते बाहेर पडले. थोड्या वेळाने ते बेशुद्ध अवस्थेत आढळल्याने गावकऱ्यांनी दुपारी एक वाजताच्या दरम्यान येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी मध्यवर्ती बॅंकेचे 15 हजार रुपयांचे कर्ज आणि नातेवाईक तसेच मित्रांकडून काही रक्कम कर्जाऊ म्हणून शेतीसाठी घेतली होती. शेतीची बिकट अवस्था आणि कर्जबाजारीपणामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. नांदणे यांच्याकडे अहमदाबाद जागापूर शिवारात दोन एकर शेती असून, यावर्षी त्यांनी कपाशीची लागवड केली होती.
नागपूर - नरखेड तालुक्‍यातील येणीकोणी येथील अरुण तुकाराम डाखोळे (वय 35) यांनी नापिकी आणि कर्जाच्या ओझ्यामुळे रविवारी सायंकाळी आत्महत्या केली. त्यांच्यावर सोसायटीचे 20 हजारांचे कर्ज होते.

No comments: