Sunday, June 10, 2012

राष्ट्रीयकृत बँकानी विदर्भात शेतकर्‍यांची कोंडी-- आतापर्यंत उद्दिष्टाच्या १५ टक्केच कर्ज वाटप-लोकमत


राष्ट्रीयकृत बँकानी विदर्भात शेतकर्‍यांची कोंडी-- आतापर्यंत उद्दिष्टाच्या १५ टक्केच कर्ज वाटप-लोकमत
आयुक्तांकडून कानउघाडणी- राष्ट्रीयकृत बँकांना ३0 जूनपर्यंतचा अल्टीमेटम
यवतमाळ। दि. ९ (शहर वार्ताहर)
खरीप हंगामाच्या तोंडावर राष्ट्रीयकृत बँकानी विदर्भात शेतकर्‍यांची कोंडी केली आहे. यामुळे हजारो शेतकरी संकटात अडकले आहेत. याच कारणाने एक हजार कोटींच्या कर्ज वाटपात राष्ट्रीयकृत बँकाना आयुक्तांनी पूर्ण कर्ज वाटपाकरिता ३0 जूनचा अल्टीमेटम दिला आहे.
विदर्भातील शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी शेतकर्‍यांनी बँकांकडे धाव घेतली आहे. कर्ज मागणार्‍या शेतकर्‍यांची राष्ट्रीयकृत बँका हकालपट्टी करीत आहे. पेरणीच्या तोंडावर बियाणे मिळाले नाही म्हणून शेतकरी चिंतेत आहे. या स्थितीत बँकेच्या अडवणुकीच्या धोरणाने शेतकरी खचले आहे.
पेरणीपूर्वी १00 टक्के कर्ज वाटप होणे गरजेचे आहे. असे असले तरी राष्ट्रीयकृत बँकांनी केवळ १५ टक्केच वाटप पूर्ण केले आहे. यासंदर्भात आयुक्तांनी अमरावतीमध्ये घेतलेल्या विभागीय आढावा बैठकीत हे वास्तव पुढे आले. याच कारणाने आयुक्त संतापले. त्यांनी राष्ट्रीयकृत बँकांना कर्ज वाटपाकरिता ३0 जूनची मुदत दिली आहे. या मुदतीत कर्ज वाटप पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी आयुक्तांनी दिल्या. कर्ज वाटप करण्यात हयगय करणार्‍या व उद्दीष्ट पूर्ण करण्यास अपयशी ठरलेल्या बँकांची वरिष्ठांकडे तक्रार केली जाणार असल्याचे आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले.
राष्ट्रीयकृत बँका कर्ज देण्यासाठी फार वेळ लावत आहेत. याच संधीचा फायदा घेत दलालांनी जाळे विणणे सुरू केले आहे. कर्ज काढण्यासाठी येणार्‍या शेतकर्‍यांना हे दलाल आपण तात्काळ कर्ज देवू, अशी बतावणी करून शेतकर्‍यांकडून पैसे लाटत आहेत.